वाई : जिल्ह्यात कोरोनामुक्त असलेल्या वाई तालुक्यात अखेर कोरोनाच्या विषाणूने घुसखोरी केलीच आहे. प्रशासनाने दोन महिने घेतलेल्या मेहनतीवर शेवटी पाणी फिरले. आसरेपाठोपाठ वासोळे येथील मुंबईतील वाशी-तुर्भे स्टोर येथील रहिवासी असणारी ४८ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित निघाली. दहाय्याट व देगावमध्येही रुग्ण आढळले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
दहाटसह देवगाव येथेही मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना धोका असल्यामुळे सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. वासोळे येथील काळेवाडीतील पती, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह गावातील आणखी एक असे पाचजण मुंबईहून रविवार, दि. १७ रोजी रात्री कोपरखैरणेमधील मेव्हण्याच्या चारचाकी गाडीतून निघाले. वासोळे, कोळेवाडी येथील घरी सोमवारी पहाटे आल्यावर त्यांनी कुटुंबासह होम क्वॉरंटाईन करून घेतले. त्यांना मंगळवारी सकाळपासूनच सर्दी, तापाचा त्रास होऊ लागला. त्यांना प्रथम मालतपूर येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले.
प्राथमिक उपचार करून किसन वीर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले. त्यांचा ताप पुन्हा वाढल्याने कोरोना विषाणूचे लक्षणे असल्याची दाट शंका आल्याने संबंधित रुग्णाला बुधवारी जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. तालुक्यात लागोपाठ दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आरोग्य विभागासह महसूल व पोलीस खडबडून जागे झाले.
कोरोना बाधित रुग्णाची पत्नी, मुलगा, मुलगी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. वासोळे येथे आणखी एक मुंबईस्थित व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्याने या परिसरात संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहीत मिळवण्याचे काम सुरू होते. वासोळे येथे गावी घेऊन गेलेल्या कोपरखैरणेमधील चालकाशी आरोग्य विभागाने संपर्क केला आहे. तो याच भागातील असल्याने त्याने आणखी काही मुंबईकरांना आणून सोडले आहे. त्यामुळे चालक आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे, याची खातरजमा केली जात आहे.लक्षणे जाणवूनही गाव केले जवळवाशी तुर्भे स्टोर येथून वासोळे येथे आलेल्या रुग्णाला शुक्रवार, दि. १५ पासून मुंबईतच तापाची लक्षणे जाणवली होती. परंतु भीतीने तपासणी न करता पूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन गावाकडचा रस्ता धरला. लॉकडाऊनपूर्वी गावाला आले होते. संबंधित रुग्णाला मुंबईमध्येच कोरोनोची लागण झालेली असल्याने वासोळे येथे आल्याआल्याच त्यांना कोरोनाने घेरले.
जिल्ह्यात आणखी २६ कोरोना संशयित दाखल
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची साखळी वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात रविवारी आणखी २६ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या २७८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ७७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनही आता हतबल होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी आणखी २६ कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.