कऱ्हाड : कऱ्हाड अर्बन बँकेने कायदेशीर वसुली कारवाई पोटी जप्त केलेल्या तारण मिळकतीमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केल्याबद्दल चौघांविरोधात कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली.कऱ्हाड अर्बन बँकेच्या मलकापूर शाखेच्या थकबाकीदार असणाऱ्या सहारा एंटरप्राईजेसतर्फे शमशाद ताजुद्दीन पटेल, तरबेज ताजुद्दीन पटेल, तोहिद ताजुद्दीन पटेल,तोफिक ताजुद्दीन पटेल यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेद्वारे थकीत कर्जापोटी कोयना वसाहत येथे पटेल यांची असणारी मिळकत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलदारांमार्फत जप्त करून कर्ज वसुलीपोटी बँकेच्या ताब्यात घेण्यात आली होती. बँकेने जप्त केलेल्या या मिळकतीमध्ये संबंधित चौघांनी प्रवेश करून मिळकतीला केलेले सील तोडून व लावलेले कुलूप कटरच्या साह्याने उचकटून मिळकतीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. त्याबद्दल बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित चौघांविरोधात कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
कऱ्हाड अर्बनच्या जप्त मिळकतीत घुसखोरी करणाऱ्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:43 AM