पाचवड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आनेवाडी टोलनाका ते उडतारे दरम्यान टायर फुटल्याने भरधाव कार नियंत्रण सुटून पाठीमागून येत असलेल्या कारला धडकली. यामध्ये चार जण जखमी झाले. जखमींमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्यासह साताऱ्याचे माजी नगरसेवक सागर पावशे यांचा समावेश आहे.
भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास कार (एमएच ११ सीएस ५५४४) या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे कार महामार्गाच्या कठड्यावर जाऊन धडकली. त्याचवेळी पाठीमागून येत असलेली कार (एमएच ११ एडब्ल्यू ७१६२) ला धडकली. या विचित्र अपघातात दोन्ही गाड्यांमधील चार जण जखमी झाले होते.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक थोडा वेळ थांबवून उपस्थितांनी लगेचच मदतकार्य केले. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले. या अपघाताची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार घाडगे तपास करीत आहेत.
चौकट :
अपघातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार जखमी झाले असल्याची माहिती समजताच त्यांचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
फोटो ०२पाचवड-अॅक्सिडेंट
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका ते उडतारे दरम्यान टायर फुटल्याने कारचा अपघात झाला. यात राष्ट्रवादीचे दीपक पवार, सागर पावसे जखमी झाले. (छाया : महेंद्र गायकवाड)