सातारा : अंबवडे (ता. सातारा) येथे वर्षेरापूर्वी एका फार्महाऊसवरील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरणाºया चौघांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.आकाश राजू धोत्रे (रा. दिव्यनगरी, सातारा), सचिन विजय पवार (रा. सोनके ,ता. कोरेगाव), योगेश हिरामण पवार (रा. विराटनगरी, ता. वाई), सागर अर्जुन कणसे (रा. शेरेवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत अशोक तपासे (रा. सातारा) यांच्या मालकीचे अंबवडे बुद्रुक येथे फार्महाऊस आहे. त्याठिकाणी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर व इतर औजारे ठेवली जात होती. दरम्यान १५ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या फार्महाऊसवरील वॉचमनचे हातपाय बांधून पाच जणांनी टॅक्टर चोरून नेला होता.
याप्रकरणी तपासे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तालुका पोलिसांनी तब्बल एक वर्षे तपास करून अखेर काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हामदाबाज येथील खुनाची व ट्रॅक्टर चोरीची कबुली मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान संशयितांनी ट्रॅक्टर सोनके येथील एकाला विकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी एका-एकाला अटक केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, सुजीत भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, दीपक बर्गे, सतीश पवार यांनी केली.