सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने अनधिकृत टपऱ्यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई अधिक गतिमान केली आहे. पथकाने गुरुवारी दुपारी जुन्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील चार टपऱ्या जप्त केल्या, तर दोन टपरीधारकांनी स्वत:हून टपऱ्या हटविल्या.
सातारा शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, फूटपाथ शासकीय कार्यालयाच्या परिसरात टपऱ्यांची रांग वाढू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण पथकाने आठ दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील सर्व टपऱ्या हटविण्यात आल्या. यानंतर पथकाने पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिसर टपरीमुक्त केला.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी जुन्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात नव्याने लावण्यात आलेल्या चार टपऱ्या जप्त केल्या, तर दोन टपरीधारकांनी स्वत:हून टपऱ्या हटविल्या. शहरात अनधिकृतरीत्या हातगाड्या व टपऱ्या लावणाऱ्यांवर पालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे. संबंधितांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
फोटो : २५ सातारा पालिका अतिक्रमण
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी जुन्या उप-प्रादेशिक कार्यालयाच्या आवारातील चार टपऱ्या जप्त केल्या.