सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील एका दुकानातून विविध कंपनीचे सुमारे ७३ हजारांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. या चोरीचा छडा लावण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले असून, अवघ्या पाच तासांत चौघा संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून दुचाकीसह चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
अमिर आदम तांबोळी (वय २४, रा. गणेश चौक, कोडोली सातारा), अक्षय दिलीप माने (वय १९, रा. सागर सोसायटी, धनगरवाडी, कोडाली), शिवय जयवंत वाघ (रा. अमरलक्ष्मी कोडाली, सातारा) या तिघांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीचे दुकान आहे. या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने गुरुवारी मध्यरात्री आत प्रवेश केला. दुकानातील कनेक्शन बॉल पीन, अॅल्युनिनियम पिस्टन, नॉचफोर्क एल ब्रँकेट, बॉलशॉकेट पिस्टण, रॉडहोनिंग मशिन मोटारसह आदी साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. त्यानंतर सुनील विलास भिंगारदेवे (वय ३५, रा. आरे, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान, औद्योगिक वसाहतीमध्ये काही युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती हवालदार राजू मुलाणी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाºयांसह तेथे धाव घेतली. त्यावेळी वरील हे युवक दुचाकीवरून जात होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोेलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने औद्योगिक वसाहतीमधील दुकानातात चोरी केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही जप्त केला. पुढील तपासासाठी या चौघांना सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू मुलाणी, पोलीस नाईक सुजीत भोसले, सागर निकम, संतोष शेलार, रमेश चव्हाण, हवालदार परिहार यांनी केली.