सातारा : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या मात्र नियमित सुरू आहेत. प्रवासी हेच दैवत माणून सातारा विभागातील १५९३ चालक, १३६० वाहक असे १९५३ चालक-वाहक कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा दररोज चाळीस-पन्नास हजार प्रवाशांशी संपर्क येत असतो; पण अजूनही त्यांच्या लसीकरणाचा विचार झालेला दिसून येत नाही.
कोरोनाचा संसर्ग मार्चमध्ये वाढला. तेव्हापासून दसऱ्यापर्यंत एसटीला मोठा फटका बसला. तो भरून काढण्यासाठी साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी विशेष प्रयत्न करून एसटीची चाकं पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना केल्या. त्याचप्रमाणे कोरोनापूर्वीप्रमाणे फेऱ्याही सुरू केल्या असून, शाळा-महाविद्यालये सुरू केल्यामुळे ग्रामीण भागांमध्येही एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
सातारा विभागात दररोज सरासरी १९०० चालक-वाहक एसटी घेऊन सेवा बजावत आहेत. त्यातील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या असतात. ज्यावर संसाराचा गाडा चालला आहे, त्या एसटीला पूर्वीप्रमाणे सोन्याचे दिवस यावेत, यासाठी चालक-वाहक जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. मात्र, प्रवासी मात्र अतिशय बेफिकीरपणे वागत असल्याचे जाणवत आहे. ‘मास्क नाही, प्रवेश नाही,’ या आशयाचा फलक लावून जनजागृती केली जात आहे. जिल्हा प्रशासन, एसटीतील चालक-वाहकांनी विनंती करूनही मास्कचा वापर करत नाहीत. काही सांगायला गेल्यास वादावादीच्या घटना घडत आहेत. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दोन दिवसांपूर्वी पोलिसांनीच एसटीत शिरून मास्क न वापरलेल्यांना खाली उतरून दंड केला होता. यावरून चालक-वाहक किती धोक्यात काम करत आहेत, याची जाणीव होते.
चौकट
चालक
१५९३
वाहक
१३६०
रोज फेऱ्या
२२०००
चौकट
६०,००० प्रवाशांशी रोज संपर्क
सातारा विभागात अकरा आगार असून, त्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण ही मोठी आगार आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी वीस ते बावीस हजार फेऱ्या सुरू आहेत. त्यामाध्यमातून अंदाजे साठ हजार प्रवाशांशी दररोज संपर्क येत आहे. एकट्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात वीस हजार प्रवाशांची वर्दळ असते.
चौकट :
लसीकरणाकडे लक्ष
केंद्र व राज्य शासनाकडून लसीकरणास सुरुवात झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्यांना कोरोनाचे लसीकरण केले जात आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील दुर्गम आजारी असणारे तसेच साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे.
एसटीचे कर्मचारीही कोरोनात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी चालक-वाहकांतून केली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कधी लस मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विभागीय कार्यशाळेत एसटीचे निर्जंतुकीकरण
एसटीचे कर्मचारी, प्रवासी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या नियमावलीनुसार एसटी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.
विभागीय कार्यशाळा तसेच अकरा आगारांमध्ये आलेली एसटी स्वच्छ धुऊन घेतली जाते, त्यानंतर रसायनांचा वापर करून एसटी हॅण्डल, सीट, दरवाजे स्वच्छ केले जातात.
एसटी प्रवासाला निघाल्यानंतर मात्र प्रवासी सतत बदलत असतात. काही ठिकाणी प्रवासी संख्या जास्त असल्यास उभे राहून प्रवास करतात. अशावेळी वाहकांना तिकीट देण्यासाठी गर्दीत जावे लागते. त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही.
चौकट
तपासणीच नाही
राज्य परिवहन महामंडळातील अनेक चालक-वाहक प्रतिबंधित क्षेत्रात कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे कोणाला त्रास होऊ लागला तर ते तपासणी करून घेतात अन् बाधित आढळल्यास उपचार करून घेतले जातात.
कोट :
एसटीचे चालक-वाहक जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. त्याचप्रमाणे प्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. एसटीचे सूक्ष्म पद्धतीने निर्जंतुकीकरण केले जात आहे.
- अजितकुमार मोहिते
यंत्र अभियंता चालन
एसटीची स्वच्छता केली जाते; पण तिकीट काढण्यासाठी सतत गर्दीतून जावे लागते. प्रवासीही कोठून कोठून फिरून आलेले असतात; पण मास्क वापरत नाहीत. त्यांना मास्क लावण्यास सांगितले तरी फरक पडत नाही.
- सागर पंडित, वाहक
प्रत्येक प्रवाशांना मास्क वापरण्यास विनंती करा, असे वरिष्ठांकडून सांगितले जाते; पण प्रवासीच ऐकत नाही. मग आम्हीच मास्क वापरल्याशिवाय एसटीत जात नाही.
- संजय माने, चालक.