Satara Honey Bee Attack: वाई तालुक्यातील पांडवगडावर इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर येथील सहा गिर्यारोहक फिरण्यासाठी आले होते. यावेळी अचानक मधमाश्या उठल्या आणि त्यांच्यावर तुटून पडल्या. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात दाखल केले. ही घटना काल, सोमवारी (दि.१०) पांडवगडावर घडली.अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते अशी जखमींची, तर चैतन्य देवळे, संतोष जापे असे गंभीर जखमींची नावे आहेत. गिर्यारोहकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची माहिती समजतात वाई पोलिस व पंचायत समितीतील तालुका वैद्यकीय विभागातील वैद्यकीय पथक पाच रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले.यावेळी वाई पोलिस ठाण्यातील नितीन कदम, श्रीनिवास बिराजदार तसेच शिव सह्याद्री ट्रेकर्स, दिशा बचाव पथकाचे राजेंद्र खरात, प्रशांत डोंगरे, आशुतोष शिंदे, रोहित मुंगसे, सौरभ जाधव, गुंडेवाडीचे पोलिस पाटील सौरभ पेटकर, गुंडेवाडी धावडी पंचक्रोशीतील युवक, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून बचावकार्य पार पाडले. गरवारे टेक्निकल फायबर यांनी तत्परतेने रुग्णवाहिका पाठवली. यामुळे जखमींना त्वरित उपचार मिळाले.
वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस लोप पावत आहे. नैसर्गिक अधिवासात भ्रमण करताना निसर्गाच्या नियमांचे पालन करावे. वास्तविक कोणताही वन्यजीव धोका वाटल्याशिवाय आक्रमण करत नाही. नागरिकांनीही वन्यजीवांशी सहानभूतीपूर्वक वर्तन करावे. - एम. एन. हजारे, वनक्षेत्रपाल, वाई
निसर्गात गडकोटावर भ्रमंती किंवा गिर्यारोहण करताना निसर्गाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मधमाशा अंगावर मारलेले परफ्युमने विचलित होतात. परफ्युम मारणाऱ्या माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. त्यामुळे कोणत्याही जंगलात कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी भ्रमण करताना, गिर्यारोहण करताना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, अत्तर व कोणत्याही प्रकारचे सुवासिक पदार्थांचा वापर न करता जंगलात भ्रमण करावे. - प्रशांत डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते, वाई