सातारा : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोरेगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार रमेश सदाशिव मदने (वय ४८, रा. अंगापूर, ता. सातारा) याला विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तिवर ७ सप्टेबर २०१५ रोजी ४९८ (जाचहाटसह) विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातील कलमे कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तत्कालीन पोलीस हवालदार रमेश मदने याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर दुसºया दिवशी ८ सप्टेबर २०१५ रोजी रमेश मदने याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.
तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुहास नाडगौडा यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने हवालदार रमेश मदने याला चार वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार विजय काटवटे, पोलीस नाईक संजय अडसूळ यांनी त्यांना सहकार्य केले.
- काशीळ येथील तलाठ्याचा मदतनीस जाळ्यात, खरेदी दस्त नोंदण्यासाठी स्वीकारले पैसे
सातारा : खरेदी दस्ताची सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना काशीळ, ता. सातारा येथील तलाठ्याचा खासगी मदतनीस गजानन बाळासाहेब माने (वय ३०, रा. बेघर वसाहत, काशीळ) याला लाचलुचतपच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास काशीळमधील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आली.
याबाबात अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदार महिलेला खरेदी केलेल्या दस्ताची नोंद करायची होती. त्यासाठी त्या काशीळ येथील तलाठी कार्यालयात शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. यावेळी तलाठ्याचा मदतनीस गजानन माने याने त्यांना नोंद झाल्यानंतर सातबारा उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती अखेर साडेतीन हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधित महिलेने लाचलुचपत कार्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर अधिका-यांनी कसलाही वेळ न दवडता तत्काळ काशीळ येथील तलाठी कार्यालय गाठून सापळा लावला. तक्रारदार महिलेकडून साडेतीन हजार रुपये घेताना गजानन माने याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला साता-यातील लाचलुचपत कार्यालयात आणण्यात आले. बोरगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, प्रशांत ताटे, विनोद राजे, संजय आडसूळ, संभाजी काटकर, विशाल खरात, शितल सपकाळ यांनी ही कारवाई केली.
- महिलेचे साडेपाच तोळ्याचे गंठण हिसकावले.............
सातारा : मुलाच्या शाळेतील स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी, स्मिता भरत निंबाळकर (वय ३७, रा. उत्तेकरनगर,सातारा) या गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजता तामजाईनगर येथील त्यांच्या मुलाच्या शाळेत स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता त्या घरी जाण्यासाठी शाळेच्या पार्किंगमध्ये त्यांच्या दुचाकीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी दोन तरूणांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे गंठण हिसकावले.
निंबाळकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर इतर लोकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे सापडले नाहीत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करत आहेत