सातारा : भांडणे लावली या गैरसमजातून एकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-२ एन. एल. मोरे यांनी अतुल ज्ञानदेव बर्गे (वय ३५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, लक्ष्मण नारायण बर्गे (वय ५२, रा. महादेवनगर, कोरेगाव) यांनी भांडणे लावली, या गैरसमजातून अतुल बर्गे योने त्यांना १४ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील जुना मोटर स्टँड येथे बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यातून अतुल बर्गे याने लक्ष्मण बर्गे यांच्या हातापायावर तसेच डोक्यात धारदार शास्त्राने वार केले.
यात लक्ष्मण बर्गे गंभीर जखमी झाले होते. केरेगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामधील तीन फितूर झाले.
न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षिदार ग्राह्य मानून न्यायालयाने अतुल बर्गे याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा सहायक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.