सातारा : आतापर्यंत आपण दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांचा स्नेहमेळावा झालेला ऐकला आणि पाहिला असेल, पण चक्क चौथीतील मुलांचा स्नेहमेळावा ३५ वर्षांनतर होऊन मुले एकत्र आली. बालपणीच्या आठवणींना या मुलांनी उजाळा दिला.
सन १९८५-८६ मध्ये चौथी पास होऊन गेलेली पाखरे सुमारे ३५ वर्षे आणि आठ महिन्यांनी पुन्हा शाळेच्या आवारात किलबिलत जमा झाली. औचित्य होते सन १९८५-८६ ला इयत्ता चौथी पास होऊन गेलेल्या नगरपालिका शाळेतील मुलांचा स्नेहमेळावा.
बाळकृष्ण जगताप यांच्या मनात सुमारे १० महिन्यापूर्वी आलेल्या कल्पनेचे प्रत्यक्षात उतरण्याचा दिवस होता, १७ जानेवारी. फेब्रुवारी महिन्यात आपल्या वर्गातील बालमित्रांना शोधण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची कल्पना मनात आली आणि आपल्यासोबत देविदास काळोखे या बालमित्राला घेऊन एकेक करत सुमारे ३५ मित्र शोधण्यात त्यांना यश मिळाले. आपल्या वर्गातील मुलांना शोधणे, तेही सुमारे ३५ वर्षे आठ महिन्यांनंतर एक अशक्य गोष्ट. खूप लोकांनी अक्षरश: वेड्यात काढले, पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता शोधमोहीम सुरूच ठेवली. शाळेतून मित्रांची नावे मिळवण्यापासून ते स्नेहमेळावा यशस्वी करणे, हे काम करत असताना खूप कष्ट पडले. मुलांना शोधण्यापेक्षा सासरी गेलेल्या वर्गातील मुलींना शोधणे, त्यांना पूर्ण विसरून गेलेल्या असताना जुन्या आठवणी जाग्या करून त्यांच्या परिवाराला समजावून कार्यक्रमासाठी हजर राहण्यापर्यंत त्यांना सतत संपर्क करत राहणे. तसेच अनेक मुलेमुली ज्यांचे आताचे वय ४० ते ४२ होऊन गेले.
सुमारे ३५ वर्षे आठ महिन्यांनंतर शिक्षकांसह कार्यक्रम घेतला. तेव्हा आपल्या बालमित्रमैत्रिणींना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांत मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. प्रत्येकाला किती बोलू आणि किती नाही, असे झाले होते. पण, शब्द सुचत नव्हते. शिक्षकांचीही तीच अवस्था झाली होती.
कार्यक्रम सुरू झाला आणि प्रत्येकाने आपली ओळख करून देताना आपण कसे घडलो, त्यामध्ये शाळा व गुरुजन यांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हे सांगत आपल्या जुन्या आठवणी सांगत अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली. प्रत्येक जण भावुक झाला होता. शिक्षकांना हा आनंदसोहळा पाहत असताना आपल्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आज मोठे झालेले पाहून अभिमान वाटत होता. त्यांनीही आपल्याला आज जगातील सर्वात मोठा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले.
फोटो :