लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आत्तापर्यंत आपण दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांचा स्नेहमेळावा झालेला ऐकला आणि पाहिला असेल पण चक्क चौथीतील मुलांचा स्नेहमेळावा ३५ वर्षांनतर झाला. या मेळाव्यानिमित्त मुले एकत्र आली आणि मुलांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
सन १९८५-८६मध्ये चौथी उत्तीर्ण होऊन गेलेली पाखरे सुमारे ३५ वर्षे आणि ८ महिन्यांनी पुन्हा शाळेच्या आवारात किलबिलत जमा झाली. यावेळी औचित्य होते सन १९८५-८६ला चौथी उत्तीर्ण होऊन गेलेल्या नगरपालिका शाळेतील मुलांचा स्नेहमेळावा.
बाळकृष्ण जगताप यांच्या मनात सुमारे दहा महिन्यांपूर्वी आलेल्या कल्पनेचा प्रत्यक्षात उतरण्याचा दिवस होता १७ जानेवारी. फेब्रुवारी महिन्यात आपल्या वर्गातील बालमित्रांना शोधण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची कल्पना मनात आली आणि आपल्यासोबत देविदास काळोखे या बालमित्राला घेऊन एक-एक करत सुमारे ३५ मित्र शोधण्यात त्यांना यश आले. आपल्या वर्गातील मुलांना शोधणे तेही सुमारे ३५ वर्षे ८ महिन्यानंतर एक अशक्य गोष्ट. खूप लोकांनी अक्षरश: वेड्यात काढले पण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता शोधमोहीम सुरूच ठेवली. शाळेतून मित्रांची नावे मिळविण्यापासून ते स्नेहमेळावा यशस्वी करणे हे काम करत असताना खूप कष्ट पडले. मुलांना शोधण्यापेक्षा सासरी गेलेल्या वर्गातील मुलींना शोधणे, त्यांना पूर्ण विसरून गेलेले असताना जुन्या आठवणी जाग्या करून त्यांच्या परिवाराला समजावून कार्यक्रमासाठी हजर राहण्यापर्यंत त्यांना सतत संपर्क करत राहणे तसेच अनेक मुले-मुली ज्यांचे आताचे वय ४० ते ४२ होऊन गेले त्यांना एकत्र आणणे.
सुमारे ३५ वर्षे ८ महिन्यांनंतर शिक्षकांसह कार्यक्रम घेतला तेव्हा आपल्या बालमित्र-मैत्रिणींना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि ओठात, मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. प्रत्येकाला किती बोलू आणि किती नको, असे झाले होते. पण शब्द सुचत नव्हते. शिक्षकांचीही तिच अवस्था झाली होती.
कार्यक्रम सुरु झाला आणि प्रत्येकाने आपली ओळख करून देताना आपण कसे घडलो त्यामध्ये शाळा व गुरुजन यांचा कसा महत्वाचा वाटा होता, हे सांगत आपल्या जुन्या आठवणी सांगत अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली. प्रत्येकजण भावूक झाला होता. शिक्षकांना हा आनंद सोहळा पाहताना आपल्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आज मोठे झालेले पाहून अभिमान वाटत होता. त्यांनीही आपल्याला आज जगातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
फोटो आहे