दीपक शिंदे ।सातारा : राज्यात सत्ता नाही, केंद्रात सत्ता आहे; पण त्याचा उपयोग नाही. स्थानिक पातळीवरील सत्तेपासूनही भाजपला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आपलेच आपल्याला जवळ घेत नाहीत म्हटल्यावर इतरांची काय स्थिती? अशी अवस्था झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच साताऱ्यात हजेरी लावली.
सत्ता आणि सत्तेनंतर बदललेली परिस्थिती स्वीकारण्याची गरज असते. अशा परिस्थितीत सत्ता नसतानाही सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम प्रमुख नेत्याला करावेच लागते. हीच भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पार पाडली. अनेकांनी भाजपच्या आमदारांना पाडण्याचे प्रयत्न केले. त्यातूनही आपल्या ताकदीवर ते निवडून आले. सत्ता येणार-येणार असे म्हणता-म्हणता हातची सत्ता गेली. केवळ १२ तासच मुख्यमंत्री म्हणून पद्भार स्वीकारून पुन्हा येण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पाळला; पण इतर मंत्र्यांच्या नशिबात काही दुसऱ्यांदा मंत्रिपदाचा योग आला नाही.
सत्ता येणार म्हणून भाजपकडे गेलेले अनेक मातब्बर आमदार सत्ता आणि सत्तेबाहेर असा पाठशिवणीचा खेळ बघत बसले. नंतर सत्ताच नाही तर विरोधकांना सत्तेवर बसण्याचे चित्र पाहावे लागले. त्यानंतर आपले काही चुकले तर नाही ना ? असे मत तयार होण्याची वेळही त्यांच्यावर आली. हे लोक आता पक्षात आले तर ते टिकवून ठेवले पाहिजेत. त्यांना एखाद्या कामगिरीत गुंतवून ठेवले नाही तर हातचे बाहेर जातील. त्याबरोबरच पक्षवाढीसाठी ठेवलेला हेतू डोळ्यासमोर धुळीला मिळताना पाहण्याची वेळ येईल. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी केलेली जुळणी किती यशस्वी होते, हे पाहावे लागेल.प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी वीर जवानांच्या विधवा पत्नी आणि माता-पित्यांचा सत्कार केलाच; पण आपल्या कार्यकर्त्यांना भाजपसोबत बांधून ठेवण्याचे कामही केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, दिलीप येळगावकर, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, सातारा नगरपालिकेचे बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांच्या घरी जाऊन चर्चा केली.
- साताऱ्यात शिवेंद्रराजेंवरच भाजपची भिस्त
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. तीन तालुक्यांसह जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव गट आहे. त्यामुळे विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला शिरकाव करणे शक्य होणार आहे. त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वगळून चालणार नाही. हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच ठाऊक आहे. गेल्या आठवड्यातच शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या पाठीवर हात ठेवून कसं चाललंय, असं विचारलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनीच शिवेंद्रसिंहराजे आपलेच आहेत. त्यांना परत घेऊयात का? असा सवाल केल्याने भाजपच्या नेत्यांचे कान टवकारले होते. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना अधिक झुकते माप देण्याच्या तयारीत भाजप नेते आहेत.
- स्थानिक संस्थांमध्ये संधीची चाचपणी
राज्यात नाही तर नाही...स्थानिक संस्थांमध्येतरी गणित जुळते का ? यासाठी भाजपच्या नेत्यांच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. नगरपालिकेत काय स्थिती आहे, याचा अंदाज घेतला गेला. जिल्हा बँकेत आपले जास्तीत जास्त लोक कसे घुसविता येतील, याबाबतही चर्चा करण्यात आली. केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करू, असा विश्वासही व्यक्त केला.
मदन भोसले यांच्याशीही गुफ्तगूसाखर कारखाने वाचविण्यासाठी मनात नसतानाही भाजपमध्ये दाखल झालेले मदन भोसले सरकार सत्तेत नसल्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत सापडले. त्यांनाही दिलासा देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर दिला. त्यामुळे फार काही नाही; पण पुन्हा काम करत राहण्याची ताकद मदन भोसले यांना मिळाली, असे दिसते.
विधानसभा निवडणूक काळात निलंबित नेत्यांचीही मनधरणीविधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने भाजपमधून माजी आमदार दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली का? याबाबत चर्चा होती. पक्षवाढीच्या दृष्टीने जे सोबत आहेत त्यांच्यासह जे पक्षापासून दुरावत चालले आहेत, त्यांनाही सोबत घेण्याचे काम या दौऱ्यात करण्यात आले. पक्षाची वाताहत थांबविण्यासाठी हे प्रयत्न आशादायक आहेत.