फलटण : फलटणमधील १७ जणांकडून प्रत्येकी दोन लाख ४५ हजार रुपये घेऊन त्यांना हज यात्रेला घेऊन न जाता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी पुणे येथील अस्लम हासन चौगुले याला फलटण पोलिसांंनी अटक केली असून, फलटण शहरासह तालुक्यातील कोणत्याही नागरिकांची अशा प्रकारची फसवणूक झाली असल्यास फलटण शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.
याबाबतीत फलटण तालुक्यातील सतरा नागरिकांनी सन २०१७-२०१८ मध्ये हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला घेऊन जातो, असे म्हणून प्रत्येकी २ लाख ४५ हजार रुपये घेऊन त्यांना हज यात्रेला घेऊन न जाता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता. अस्लम हासन चौगुले, इस्माईल अस्लम चौगुले (दोन्ही रा. आळंदी-देहू रोड, चिखली, पुणे) मोहंमदसादिक मेहमुद बागवान (५१, रा. पठाणगल्ली, पाचबत्ती चौक, फलटण) यांनी आपापसात संगनमत करून सतराजणांची आर्थिक फसवणूक केलेली होती. अस्लम हासन चौगुले हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता. संबंधित संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालय येथे अर्ज केलेला होता. त्यांचे अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळून लावलेले होते. त्यानंतर त्याला फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दि. २४ ऑगस्ट रोजीपर्यंत पोलीस अभिरक्षा मंजूर केलेली आहे.