सातारा : मोबाइलवरुन संपर्क करुन तुमच्यावर मनी लॅंड्रींगची केस आहे. तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन अशी धमकी देऊन वृध्द डाॅक्टरला पैसे पाठविण्यास भाग पाडत पावणे बारा लाख रुपयांना फसविण्यात आले. हा प्रकार सातारा शहरात घडला असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुभाष गणपती घेवारी (वय ७१, रा. उत्तेकर नगर, सदरबझार सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तर अनिल यादव आणि सुनील कुमार (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दोघांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे.
पोलिसांनी सांगितले की, यातील तक्रारदार हे निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत. दि. १७ ते १८ मार्चदरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. डाॅ. घेवारी हे घरी असताना त्यांना विविध दोन मोबाइलवरुन काॅल आले. त्यांनी आपली नावे अनिल यादव आणि सुनील कुमार असल्याचे सांगितले. त्यानंतर घेवारी यांच्याशी मोबाइलवरुन वारंवार संपर्क करण्यात आला. यावेळी आरोपींनी तुमच्यावर मनी लॅंड्रींगची केस आहे. त्यामध्ये तुम्ही डिफाॅल्टर आहात. यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुरुंगात टाकू अशी धमकी देण्यात आली. तसेच घेवारी यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले. यामध्ये ११ लाख ७४ हजार २३ रुपयांची रक्कम घेवारी यांनी आरोपींना पाठवली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डाॅ. सुभाष घेवारी यांनी २१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलेला आहे.