वडूज : शेअर मार्केटच्या माध्यमातून १०५ दिवसांत पैसे दामदुपटी करून देण्याचे आमिष दाखवून वडूज येथील कोडूमुलाईल जोसेफ अब्राहम यांची १४ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी निरंजन महेश कुलकर्णी (रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार अब्राहम हे एका नामांकित टायर कंपनीमधून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते त्यांच्या मुलीकडे वडूज येथे वास्तव्यास आहेत. यातील संशयित कुलकर्णी व तक्रारदार यांचे जावई यांची ओळख असल्याने त्याचे त्यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्या ओळखीच्या माध्यमातून निरंजन कुलकर्णी याने अब्राहम यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची गळ घालून त्यांना १०५ दिवसांत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले.अब्राहम यांनी कुलकर्णी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सेवानिवृत्तीनंतर आलेले १४ लाख ६ हजार पाचशे रूपये त्याच्याकडे गुंतवले. अब्राहम यांनी कुलकर्णी याला बँक खात्यातून काही रक्कम ट्रान्सफर केली होती तर तीन लाख रूपये रोख स्वरुपात दिले होते. कुलकर्णी याने दिलेली मुदत संपल्यानंतर अब्राहम यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर कुलकर्णी यांनी अब्राहम यांना दोन धनादेश दिले होते. ते दोन्ही धनादेश कुलकर्णींच्या खात्यावर पैसे नसल्याने परत आल्याने कुलकर्णींकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अब्राहम यांनी वडूज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली.पोलिसांनी घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन कुलकर्णी याला ताब्यात घेतले. अब्राहम यांच्यासारखी अनेक लोकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणांमध्ये आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे.तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहनअशा प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी वडूज पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी केले आहे.