फलटण : फलटण डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन, बारामती, फलटण शाखा यांच्या संयुक्त सहभागाने बुधवार, दिनांक २६ रोजी दुपारी एक ते चार या वेळेत कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात म्युकरमायकोसिस रोगनिदान मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहोत. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून नुकतेच या महामारीचा सामना करतो ना करतो तोच, कोरोना आजारात वापरण्यात आलेली स्टेरॉइड्स, अनियंत्रित असणारा मधुमेह, यामुळे रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन त्यांना कोरोनापश्चात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. हा बुरशीजन्य आजार घातक असून, यामध्ये सुमारे ४० ते ८० टक्के मृत्यूदर आहे. काही रुग्णांची दृष्टी कायमची जात आहे. काही रुग्णांचे नाक व जबड्याचे हाड काढून टाकावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर रोग निदान मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.