लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक : ‘राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन धान्य दिले जाते. जिल्ह्यात होणाऱ्या धान्यवाटपात कोरेगाव तालुका अग्रेसर असल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनाकाळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्या सूचनेनुसार कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम व नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांच्या सूचनेवरून सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात जवळपास ९७ टक्के वाटप झाले. ते पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी सुनील बोतालजी यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ३१,६३८ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात येते. त्यापैकी तालुक्यातील ३०,५०३ शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटप होऊन ते पूर्णत: लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत कोरेगाव तालुका ऑनलाईन वाटपामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे. आजपर्यंत ९७ टक्के वाटप पूर्ण झाले आहे. जून महिन्यात अंत्योदय अन्न योजना प्रतिकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ, प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. त्यामध्ये दोन रुपये गहू प्रतिकिलो, तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो या दराने वितरित करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय योजना कुटुंबातील सदस्यांना, तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील ३१,६३८ कार्डधारकांना व १,३२,६१५ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रेशन धान्याचे वितरण रास्त भाव दुकानातून ई पॉस मशिनद्वारे करण्यात येत आहे,’ अशी माहिती तालुका पुरवठा निरीक्षक एस. जी. पवार यांनी दिली.
चौकट
लाभार्थी, विक्रेत्यांमध्ये समन्वय
कोरेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत धान्यवाटपाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. रेशन धान्य दुकानातून गावपातळीवर याचे वाटप व्यवस्थित सुरू आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत धान्य गरिबांना दिले जात आहे. तहसील कार्यालय लाभार्थी व रास्त धान्य विक्रेते यांच्यात समन्वय ठेवत वेळोवेळी सहकार्य करत असतात, अशी माहिती स्वस्त भाव दुकानदार धनंजय धुमाळ यांनी दिली.