कुडाळ : महाबळेश्वर-मेढा मार्गावर असलेल्या केळघर घाटात बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास परिवहन विभागाची मालवाहतूक बस तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालक व वाहक दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मयूर शामराव पावनीकर (४०) व रामकिशन अशोकराव केंडे (४२) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडी आगाराची मालवाहतूक करणारी एसटी बस (एम.एच. २०, बीएए ०४२९) बुधवारी रात्री कलिंगड घेऊन माणगावहून सांगलीकडे निघाली होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही बस महाबळेश्वर-मेढा मार्गावर असलेल्या केळकर घाटातील काळा कडा येथे आली. येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व बस झाडाला धडकून थेट पाचशे फूट खोल दरीत कोसळली.
या अपघातात देवरूख आगाराचे चालक मयूर पावनीकर व रामकिशन केंडे हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर व मेढा पोलीस ठाण्याच्या पथकासह महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. अखेर अथक परिश्रमानंतर जखमींना दरीतूर बाहेर काढून उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुकवली ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने जखमींना जीवदान मिळाले.
फोटो : १२ मेढा अपघात
महाबळेश्वर-मेढा मार्गावर असलेल्या केळघर घाटातील एका वळणावर बुधवारी रात्री मालवाहतूक एसटी बस पाचशे फूट खोल दरीत कोसळली.