पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी सकाळी चक्क महाकाय रानगव्यांचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. परंतु, त्यांच्या मनामध्ये चांगलीच भीती निर्माण झालेली दिसून येत होती.
सातारा शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर कास पठार हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेला दिसतो. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मीळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे. बैलकुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा पारंबेफाटा ते एकीव या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं
निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांच्या वारंवार झुंडी दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसत आहे. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. गेल्या एक-दोन महिन्यांत कास पठार परिसरात महाकाय रानगव्यांचे अनेकांनी वारंवार दर्शन घेतले.
(चौकट)
पर्यटनप्रसंगी वन्यपशूंपासून सावध राहा...
अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा करू नये, तसेच दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये, त्याला चिडविण्याचादेखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात. परंतु, त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशूपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.