नसीर शिकलगार ल्ल फलटणफलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या पुढील पिढीने जिल्हा व तालुक्याच्या राजकारणात पदार्पण केले असून, नवीन नेतृत्वाची ही लढाई आरपारची होणार असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोणाला ही निवडणूक विजयी करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.फलटण तालुक्यातील सर्व सत्तास्थाने राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती असून, त्यांना त्यांच्या राजकरणात दोन्ही बंधू संजीवराजे व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर सलग सहाव्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने त्यांनी तरडगावसारखा सेफ मतदारसंघ निवडला आहे. संजीवराजेंच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर या ही सलग पाचव्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात असून, त्या साखरवाडी जिल्हा परिषद गटातून रिंगणात आहेत. याच राजघराण्यातील आणखी एक व्यक्ती नव्याने राजकारणात प्रवेश करीत आहेत. रामराजेंचे बंधू रघुनाथराजे यांचे पुत्र विश्वजीतराजे हे आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वाठार निंबाळकर पंचायत समिती गणातून करीत आहेत. नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील चौथी पिढी राजकारणात येत आहे.दुसरे आणखी एक नाईक-निंबाळकर घराणे म्हणजे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सून आणि कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर या गिरवी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्ह्याच्या राजकारणात उतरत आहेत. पंचायत समितीच्या सदस्या म्हणून त्यांचा अनुभव असला तरी जिल्हा परिषदेची निवडणूक त्या प्रथमच लढवित आहेत.प्रतिष्ठेच्या गिरवी जिल्हा परिषद गटातील त्यांची अटीतटीची लढाई राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार रामदास कदम आणि भाजपाचे उमेदवार सह्याद्री कदम यांच्याशी होत आहे. सह्याद्री कदम हे फलटणचे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र असून, त्यांची ही पदार्पणाची निवडणूक आहे. राजकारणाचा श्रीगणेशा सह्याद्री कदम निवडणुकीच्या माध्यमातून करीत असल्याने गिरवी गटातील निवडणूक राज्यात गाजण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील हे ही हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी पंचायत समिती सदस्या म्हणून ते पहिल्यांदा सामोरे जात आहे.स्वराज संघटनेचे अध्यक्ष व युवा नेतृत्व दिगंबर आगवणे यांनीही कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गिरवी गणातून पत्नी जयश्री आगवणे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. जयश्री आगवणे या पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करीत असून, निवडणुकीची पूर्व तयारी त्यांनी बऱ्याच दिवसांपासून करीत जनसंपर्क वाढविला आहे. युवा नेतृत्वांची ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची ठरणार आहे.
नव्या नेतृत्वाचा फलटण तालुक्यात कस
By admin | Published: February 08, 2017 10:54 PM