मायणी : अल्प आजाराने संदीप भागवत या वर्गमित्राचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १९९२च्या दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील भारतमाता विद्यालयामध्ये १९९२ साली दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज वयाच्या ४४ व्या वर्षी इतरत्र नोकरी, व्यवसायामुळे स्थिर झाले आहेत. मात्र, समाजमाध्यमातून हे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तीस वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत. रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी बालपणापासूनबरोबर असलेल्या संदीप भागवत यांचे अल्प आजाराने निधन झाले. घरातील कर्त्या माणसाचे निधन झाल्याने कुटुंबावर मानसिक आघात झाला होता. कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. भागवत यांच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक आघातातून बाहेर काढण्यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी मदत करण्याचा निश्चय केला.
राजेंद्र आवळकर, अल्ताफ इनामदार, सचिन तावरे ,मंगेश सुपेकर, शिवाजी कंड्रे, अर्चना पवार, राजेंद्र पाटील, मिलिंद महामुनी, मुक्ता भोसले, सुप्रिया गाडे, स्मिता डांगे, महेश बच्चे, चेतन जाधव, उत्तम थोरात, संतोष पाटील, मोहन महाडिक, मारुती पवार, सुनील जाधव, भूषण विभुते, बाबासाहेब देशमुख ,धोंडीराम घाडगे, रमेश यलमर, विजया कुलकर्णी, सोमनाथ कांबळे यांनी एकत्र येत आपल्याला जमेल त्याप्रमाणे पैसे एकत्र करून भागवत यांच्या कुटुंबाला ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली.
१९९२नंतर विविध क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येत आपल्याच वर्गमित्राला अशाप्रकारे आर्थिक मदत करून आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. ही आर्थिक मदत मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
०९ मायणी
वर्गमित्र दिवंगत संदीप भागवत यांच्या कुटुंबाला दहावीतील मित्रांनी मदतीचा हात दिला. (छाया : संदीप कुंभार)