रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे राहत असलेल्या महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन शेजारी राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीने एटीएम चोरून पन्नास हजार रुपये खात्यातून लंपास केले. याप्रकरणी चांदणी पोपट जाधव (वय २०, रा. ब्रह्मपुरी, ता. कोरेगाव) हिला अटक करण्यात आली. दरम्यान, रहिमतपूर पोलिसांनी या घटनेचा चोवीस तासांत छडा लावला.
याबाबत मंगल सुरेश चव्हाण (सध्या रा. ब्रह्मपुरी, ता. कोरेगाव, मूळ रा. कुडाळ, पोस्ट. शावळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादित व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगल चव्हाण या मुलांच्या शिक्षणासाठी खोली भाड्याने घेऊन ब्रह्मपुरी येथे राहतात. त्यांचे कराड अर्बन बँक शाखा कोरेगाव येथे बँक खाते असून, एटीएमही आहे. त्यांना एटीएम वापरता येत नसल्यामुळे त्या नेहमी पैसे काढताना दुसऱ्यांची मदत घेऊनच पैसे काढत. गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरमालक अण्णा यांच्याबरोबर मंगल चव्हाण या पॉलिसीचे पैसे भरण्यासाठी रहिमतपूर येथील कराड अर्बन बँकेच्या शाखेत गेल्या. बँकेतून दहा हजार रुपये काढले. त्यावेळी मंगल चव्हाण यांनी अण्णा यांना खात्यात पैसे किती आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी खात्यावर ८ हजार ९०० रुपये शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आपल्या खात्यांमधील इतर पैसे गेले कुठे?’ असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी बँकेत जाऊन अधिकाºयांना खात्यातील रकमेबाबत विचारणा केली असता ६ आॅगस्ट २०१८ रोजी दहा हजार रुपये व ७ आॅगस्ट रोजी चारवेळा दहा-दहा हजार रुपये याप्रमाणे पन्नास हजार रुपये एटीएममधून काढल्याचे सांगितले.
याबाबत अज्ञाताने एटीएम चोरून पैसे काढून पुन्हा एटीएम घरात ठेवल्याची तक्रार चव्हाण यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष नाळे यांनी तपास सुरू केला. फिर्यादीचे बँक स्टेटमेंट व एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला चोवीस तासांत अटक केली. आरोपींकडून पन्नास हजार रुपये जप्त केले.या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, सचिन राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता घाडगे, मेघा फडतरे यांनी सहभाग घेतला होता.