सायगाव : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या आदेशाने आनेवाडी टोलनाका येथे अंमलबजावणी होते आहे का? याच्या तपासणीसाठी सोमवारपासून महसूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी आनेवाडी टोलनाक्याची पाहणी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या या पाहण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, चक्क दहा सेकंदात गाडी टोलनाका पार करत असल्याचे चित्र या अधिकाऱ्यांनी अनुभवलं.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी टोलनाक्यावरून १० सेकंदात वाहने पुढे गेली पाहिजेत, असे आदेश टोल प्रशासनाला दिले होते. त्याची तपासणी करण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार रणजित देसाई, मंडल अधिकारी व्ही. डी. गायकवाड, तलाठी, पोलीस प्रशासन यांनी तासभर पाहणी करून किती वेळात वाहने जातात याची नोंद केली. त्याचबरोबर टोलनाक्यावरील सोयी सुविधांची पाहणी केली व प्रशासनाला यावेळी रिलायन्स कंपनी व टोल प्रशासनाने अधिकाऱ्यांना वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली.यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत अधिकाऱ्यांनी सातारा ते पुणे बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी घेऊन संध्याकाळी पुन्हा पुणे ते सातारा जाणाऱ्या मार्गावरील वाहनांच्या किती वेळामध्ये टोलनाका पास करतात. याची नोंद घेऊन पुढील शनिवार व रविवारी अशा प्रकारची पाहणी होणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर टोलप्रशासनाला त्यांच्या त्रूटी दाखवून त्यामध्ये सुधारणा करावयास सांगितले. या टोल पाहणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले.या पाहणीवेळी संपूर्ण महसूल प्रशासन यावेळी टोलनाक्यावर हजर असल्याने टोलनाक्याला शासकीय कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी सातारा पोलीस, भुर्इंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वाहने लवकर सुटत असल्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. विक्रेत्यांना मज्जावटोलनाक्यावर महसूल अधिकाऱ्यांची पाहणी असल्याने दिवसभर स्ट्रॉबेरी, पाणी, भाजीपाला तसेच इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांस याठिकाणी टोलप्रशासनाद्वारे मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे टोलनाक्यावर खाद्य विक्रीवर बंधने येणार का? टोलनाक्यावर सुरू असलेला रोजगार कायमचा संपणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले.
अधिकाऱ्यांसमोर दहा सेकंदात टोलनाका ओलांडून गेली वाहने
By admin | Published: December 11, 2015 12:03 AM