संजय कदम वाठार स्टेशन : दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाई व इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिमाण शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांवर झाला आहे. राज्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर चालणारा साखर उद्योग ही वाढत्या इंधन दरामुळे अडचणीत सापडला आहे. मुळात साखर कारखान्यांना तोडणी व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याने वाहतूक दर वाढविण्याची मागणी ऊस वाहतूकदार करत आहेत.
साखर कारखाना आणि वाहतूकदार दर तीन वर्षांतून एकदा तोडणी आणि वाहतूक दरात वाढ करतात. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी तोडणी करणाऱ्या लोकांनी संप केल्यानंतर त्यांना ३५ टक्के तोडणी दर वाढ मिळाली. मात्र गेल्या दोन वर्षांत वाहतूकदारांना मात्र वाहतूक वाढ मिळाली नाही. राज्यात तोडणी दर हा सर्वत्र एकच असला तरी वाहतूक दर मात्र सर्व कारखाने वेगवेगळे देतात. एकूणच तोडणी, वाहतुकीसाठी दिला जाणारा दर हा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीमधून दिला जात असल्याने याचा फटका राज्यातील २० लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो.
दोन वर्षांपूर्वी डिझेल ६५ रुपये लिटर होते. त्यानुसार वाहतूकदारांना वाहतूक दिली जात होती. आज डिझेल दर ९४ रुपये असतानाही जिल्ह्यातील अनेक कारखाने ६५ ते ७५ रुपये दराने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना दर देत आहेत. तो कोणत्याही प्रकारे या वाहनधारकांना परवडत नाही. वाहतुकदारांची देखील आर्थिक घडी महागाईमुळे विस्कटली आहे. त्यामुळे दरवाढीची मागणी होऊ लागली आहे.
ऊस वाहतुकीचे मोडले कंबरडे
दरवर्षी सर्वच कारखाने ऊसतोडणी वाहतुकीचा संयुक्त करार करतात. त्यानुसार ऊस वाहतूकदारांना करार बद्ध केले जाते. हे करार कारखाना बंद झाल्यावर केले जात असल्याने त्यावेळी असलेल्या इंधन दरानुसार वाहतूक दर निश्चित होतात. मात्र सध्या डिझेल दरातील झालेली दर वाढ ऊस वाहतुकीचे कंबरडे मोडणारी आहे. यातून वाहनधारकांना कारखान्याकडून दिलासा मिळणे गरजेचे आहे.
दर तीन वाहतुकीनंतर ऊसतोडणी वाहतूक दरात वाढ केली जाते. दोन वर्षांपूर्वी तोडणी दरात वाढ करण्यात आली. मात्र वाहतूकदर जुनेच असल्याने सध्या ऊस वाहतूक करणं कठीण आहे. यासाठी वाहतूक दरात वाढ करावी. - अमर कणसे, ऊस वाहतूकदार