सातारा : सातारा जिल्ह्यातून तडीपार असतानाही पोलिसांची नजर चुकवून घरी येणं एका गुंडाच्या जीवावर बेतलं आहे. कैलास गायकवाड (वय २६) असं या गुंडाचं नाव असून तो बुधवारी (11 जुलै) रात्री घरी आला होता. त्यानंतर नातलगांना भेटून परत माघारी येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, गुरुवारी सकाळी त्याच्या घरापासून जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतेदह सापडला आहे.
कैलास गायकवाड याच्यावर सातारा तालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात मारामारीसह विविध गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये त्याला तडीपार करण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी तडीपारीचे उल्लंघन करत तो उरमोडी धरण परिसरात लपून बसला होता. मात्र शाहूपुरी पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला सातारा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आले होते. परंतु तरीही तो बुधवारी रात्री नामदेववाडी झोपडपट्टी येथे आपल्या घरी आला होता. मित्र व नातलगांना गुपचूप भेटल्यानंतर तो घराबाहेर पडला. त्याच्यासोबत अन्य दोघेजण होते. परंतु सकाळी त्याच्या घरापासूनच काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला.
कैलाससोबत रात्री असणाऱ्या दोन मित्रांवर पोलिसांचा संशय असून, पूर्वीच्या हेवेदाव्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कैलासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तत्काळ दोन पथके रवाना केली आहेत.