सातारा : तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून घेताना फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय ३३) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर दळवी हे फलटण शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते भडकमनगर (फलटण) येथे राहत असून, त्यांचे मूळगाव पुणे जिल्ह्यातील मलटण (ता. दौंड) आहे. पोलीस ठाण्यात फसवणुकीचे प्रकरण आले होते. याप्रकरणात दळवी यांनी पैशाची मागणी केलेली.याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आलेली. तक्रार देणाऱ्याच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी २० लाखांची मागणी करण्यात आलेली. त्यातील ४ लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक दळवींना पकडण्यात आले.
ही कारवाई सोमवारी रात्री नऊच्या सुमारास फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळाच्या बाजुलाच करण्यात आली. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळुंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांनी सापळा रचून ही कारवाई केली.