सातारा : ‘ते मुख्यमंत्र्यांच्या खास जवळचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसारखे वागत असल्याने अधिकारीही भीतात. मी त्यांना गब्बरसिंग म्हटले. कारण, ते जिल्हा लुटायचे काम करत आहेत. पण, मस्ती आणि हुकुमशाही फार काळ चालत नाही,’ असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला. तसेच त्यांनी राष्ट्रवादीत फुटणार नाही, असा दावाही केला.
सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे यांनी केंद्र अन् राज्य सरकारवर टीका केली. तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्यावरही नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. यामुळे कोरेगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर असावं. ते कुठेही करण्यात येऊ नये. खालच्या पातळीवर मी जात नाही. लोकं गरीब असलीतरी स्वाभिमानी असतात. लोकशाहीत लोकच उठाव करतात. त्यामुळे मस्ती फार काळ चालत नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच येईल. यामध्ये १६ आमदार अपात्र होतील. त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे सध्याचे सरकार अस्थिर असून कोसळणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक चर्चा सुरु असल्यातरी शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीतून कोणीही फुटणार नाही. फुटणार या वावड्या आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या यंत्रणेलाही माहिती मिळाली आहे की १२ च्यावर आपले खासदार निवडूण येणार नाहीत. इकडे आमदारकीही धोक्यात आहे. त्यामुळे ते निवडणुकाही लवकर घेत नाहीत. लोकसभा निवडणूक एक वर्ष तर विधानसभेची दीड वर्षावर आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटही लागू करता येत नाही. मग, आता अशाचप्रकारे सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. हे केंद्र, राज्य तसेच जिल्ह्यातही पाहत आहोत, असा घणाघातही आमदार शिंदे यांनी यावेळी केला.