सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाहूनगरीत साठ गुंठे क्षेत्रात भव्य दिव्य असे शिवाजी संग्रहालय उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तूंचा संग्रह असणारे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे संग्रहालय ठरणार आहे. या संग्रहालयासाठी पुरातत्त्व विभागाकडून १ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर झाला असून, निधीतून होणाऱ्या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.येथील मार्केट यार्डात १९६६ मध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त ठरला व १९७० मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. या संग्रहालयाचे उद्घाटन सुमित्राराजे भोसले यांच्या उपस्थितीत व तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. संग्रहालयाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, यामधून १७ व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते. मात्र, अपुरी जागा आणि पावसाळ्यात संग्रहालयाच्या इमारतीस लागणारी गळती यामुळे शिवकालीन वस्तूंचे जतन करून ठेवण्यात अनंत अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंचे भव्य संग्रहालय व्हावे, हे सातारकरांचे स्वप्न होते. हे सप्न नव्या संग्रहालयाच्या रुपाने प्रत्यक्षात साकारणार आहे.५ फेब्रुवारी २००७ रोजी नूतन संग्रहालयासाठी शासनाने हिरवा कंदील दाखविला. ‘हजेरी माळ’ मैदानावर शिवाजी संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे काम काही वर्षे अनेकविध कारणास्तव रखडले. मात्र, हे संग्रहालय पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने संग्रहालयाच्या कामास गती प्राप्त झाली आहे. पुरातत्त्व विभागानेनुकतीच संग्रहालयासाठी १ कोटी ८१ लाखांच्या निधीची तरतूद केल्याने इतिहासप्रेमी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. निधीतून करावयाच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, बांधकाम विभागाच्या वतीने नियोजित कामे केली जाणार आहेत.अशी आहेतनियोजित कामेशिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत अनेक कामे अद्याप बाकी आहेत. पुरातत्त्व विभागाने मंजूर केलेल्या निधीतून कंपाऊंड, अंतर्गत रस्ते, स्वच्छतागृह, कर्मचाºयांसाठी केबीन तिकीटगृह अशी कामे मार्गी लावली जाणार आहेत.ऐतिहासिक वस्तूंना उजाळा !या संग्रहालयात तलावारी, भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते, तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशू, गुप्ती, धनुष्यबाण, गुप्तीचे प्रकार, रणशिंग, जेडची मठ, बिचवा, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारुच्या पुड्याचा शिंगाडा, संगिनी, पिस्तुले अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, बख्तर, बाहू, आच्छादने, तुमान विविध प्रकारच्या पगड्या, शेला इत्यादी वस्तंूसह शिवाजी महाराजांची वंशावळ संग्रहालयात पाहावयास मिळणार आहे.
शिवाजी संग्रहालयास १ कोटी ८१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:09 PM