खटाव : ‘निढळ (ता. खटाव) येथील घाडगेवस्ती ते धारपुडी गावात ये-जा करण्याचा रस्ता सुस्थितीत नसल्याने व पावसाळ्यात शेतकऱ्यांची समस्या सांगितल्यानंतर या कच्च्या रस्त्याची डागडुजी स्वखर्चातून पूर्ण केली. वस्तीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही,’ असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेला हा रस्ता काही तासातच घाडगेवस्ती ते धारपुडी गावाला जोडला गेला. यामुळे वस्तीतील ग्रामस्थ व महिलांनी समाधान व्यक्त केले.
घाडगेवस्तीवर पंधरा ते वीस घरे असून, येथील लोकसंख्या ७० ते ८० आहे व त्यांचा प्रमुख उद्योग शेती व दुग्ध व्यवसाय असून, दुधाच्या चारचाकी गाड्या वस्तीत येत नसल्यामुळे दुधाचे कॅन डोक्यावर धारपुडी रोडला घेऊन जावे लागत होते. शेतामधील आले, कांदा, बटाटा, ऊस या पिकांची वाहतूक करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. धारपुडीमार्गे निढळ घाडगेवस्ती असा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. हा प्रवास आता फक्त एक किलोमीटरमध्ये पार करता येतो तर शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा हा ट्रॅक्टर, टू-व्हीलरवरून घरी आणता येतो, यामुळे येथील शेतकरी व महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जयवंतराव घाडगे, अरविंद घाडगे, सुरेश घाडगे, हरिश्चंद्र घाडगे, भीमराव घाडगे, अमित घाडगे, मनोहर घाडगे, सचिन घाडगे, सूर्यकांत घाडगे, जयसिंग घाडगे, उद्धव घाडगे, राजेंद्र घाडगे, सुनील घाडगे, संतोष घाडगे, प्रवीण घाडगे, रुपाली घाडगे, नंदा घाडगे, दीपाली घाडगे, शीतल घाडगे आदी महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.