वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 02:13 PM2022-01-03T14:13:02+5:302022-01-03T14:13:42+5:30

सातारा सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी दरवर्षी १०० कोटी प्रमाणे ३०० कोटी देण्यात येणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले

Funds for setting up of medical colleges will not be reduced testified Deputy Chief Minister Ajit Pawar | वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही 

Next

सातारा : येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल, यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,’ असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र चव्हाण, सं. गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला १२ कोटी ९९ लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.

सातारा येथे १३ कोटी १२ लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. १ व्हीव्हीआयपी कक्ष, २ व्हीआयपी कक्ष व ५ साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल,’ असेही अजित पवार म्हणाले.

सातारच्या सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी

सातारा सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी दरवर्षी १०० कोटी प्रमाणे ३०० कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Funds for setting up of medical colleges will not be reduced testified Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.