कोयनानगर : ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील खराब झालेल्या हेळवाक, मोरगिरी ते गारवडे राज्यमार्ग क्र. १४८ रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामाची फेर निविदाची कार्यवाही करून काम तातडीने सुरू करावे. या मार्गावरील अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे की, ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून नवजा, हेळवाक, मोरगिरी, गारवडे, साजूर, तांबवे, काले, विंग, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर १४८ क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला. सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेतून भरीव निधी मंजूर करावा.
पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे; परंतु याच राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर या भागातील रस्त्याच्या कामास संबंधित कंपनीकडून अद्यापही सुरुवात केली नाही. या कामासाठी निविदा निश्चित झालेल्या एल अँड टी कंपनीने पूर्णपणे काम बंद करीत कंपनीची यंत्रसामग्री अन्य ठिकाणी स्थलांतरित केली असल्याने अद्यापही पाटण ते संगमनगर या भागातील काम प्रलंबित आहेत. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का या भागातील तेरा किलोमीटर अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामाकरिता निविदा निश्चित झालेली कंपनी जर हे काम करीत नसली तर कामाची फेरनिविदा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येऊन या अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामास लवकर सुरुवात करण्यात यावी, असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.