सातारा : सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा नवे उच्चांक गाठत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत एप्रिल महिन्यात तब्बल ५३५ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वर्षभरातील मृतांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सातारा पालिकेनेही कोरोना प्रतिबंधसाठी रूपरेषा आखली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामकाजाची जबाबदारी सोपविली आहे. स्वच्छतेपासून ते कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रशासनाने पथके तयार केली आहेत. या सर्वांमध्ये अत्यंत जोखमीचे काम हे अंत्यसंस्कार करण्याचेच आहे. असे असले तरीही पालिकेचे ‘कोरोना फायटर्स’ आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत.
मृतदेह कसा हाताळावा, त्याच्यावर सुरक्षित अंत्यसंस्कार कसे करावे, अंत्यसंस्कारानंतर कोणती काळजी घ्यावी, याचे परिपूर्ण प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत दगावलेल्या २४०० पैकी तब्बल १८६० मृतांवर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांबरोबर मृतांची संख्या वाढू लागली आहे. गत वर्षी एप्रिल महिन्यात कैलास स्मशानभूमीत केवळ तीन मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर यंदा हा आकडा ५३५ वर गेला आहे. अंत्यसंस्कारासाठी कुंड कमी पडू लागल्याने पालिका प्रशासनाकडून अग्निकुंडांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आता कमी झाल्या आहेत.
(चौकट)
पालिकेचे पथक सदैव तत्पर
सातारा पालिकेचे आठ आरोग्य कर्मचारी, एक सुपरवायझर, एक वाहन चालक व अग्निशमनचे दोन कर्मचारी असे पथक कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करून नातेवाइकांची भूमिका बजावत आहेत.
कैलास स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार
महिना / मृत्यू
एप्रिल ३
मे १४
जून २०
जुलै २०४
ऑगस्ट ५६
सप्टेंबर ४२३
ऑक्टोबर २४६
नोव्हेंबर १२३
डिसेंबर ८७
जानेवारी ५३
फेब्रुवारी ५०
मार्च ६५
एप्रिल ५३५
फोटो मेल