शहापूर येथील कृष्णत कांबळे हे भारतीय सैन्यदलात एएससी बटालियनमध्ये ग्वाल्हेर येथे कार्यरत होते. त्याठिकाणी कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव शहापूर येथे दाखल होताच शहापूर, पिंपरी, शिरवडे व परिसरातील ग्रामस्थांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. पार्थिव घरासमोर ठेवल्यानंतर आई जयश्री, वडील दिलीप, पत्नी स्वाती व मुलगी अपूर्वा यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘जवान कृष्णत कांबळे अमर रहे, जय जवान, जय किसान’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिरवडे फाटा येथील मोकळ्या जागेत अंत्यविधीसाठी तयारी करण्यात आली होती. त्याठिकाणी तहसीलदार कासार, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, भाजपचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, माजी उपसभापती सुहास बोराटे, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बी. के. जगदाळे आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
पार्थिवाला कृष्णत यांचे चुलत भा्ऊ रोहन किरण कांबळे यांनी मुखाग्नि दिला. सैन्यदलातील निवृत्त सुभेदार सुनील बाबर, निवृत्त हवालदार दीपक मदने, संजय जाधव, विजय जाधव, धनाजी पवार, निवृत्त नाईक, शिवाजी बाबर, तसेच सध्या कार्यरत असलेले हवालदार अजय जाधव, अर्जुन जाधव यांनी सर्व व्यवस्था केली होती. तसेच गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
फोटो : ०१केआरडी०४
कॅप्शन : शहापूर (ता. कऱ्हाड) येथील जवान कृष्णत कांबळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.