सातारा : पालिकेच्या अंत्यसंस्कार पथकातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार करून आपले दायित्व पूर्ण केले आहे. या पथकाचा पालिकेला सार्थ अभिमान आहे,’ असे गौरवोद्गार नगराध्यक्षा माधवी कदम यांनी काढले.
पालिकेने कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात येताच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची बाटली देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगराध्यक्षांचे स्वीय सहायक अतुल दिसले, अमोल लाड आदी उपस्थित होते.
कपिल मट्टू, लक्ष्मण कांबळे, तुकाराम खंडझोडे, अमोल खंडझोडे, प्रेमसिंग मोहीते, यशवंत कांबळे, शंकर भंडारे, शंकर कमाणे, विश्वास लोखंडे, अमोल वाघमारे, प्रमोद गाडे, आशिष वायदंडे, गणेश वायदंडे, संदीप पाटसुते, प्रशांत गंजीवाले यांचा नगराध्यक्षाच्या दालनात यथोचित गौरव करण्यात आला. आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांचे कोरोना प्रतिबंधासाठी मोलाचे योगदान आहे, असे उद्गार यावेळी अनिता घोरपडे व स्नेहा नलवडे यांनी काढले.
फोटो : १५ सातारा पालिका
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते अंत्यसंस्कार पथकातील कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी अनिता घोरपडे, स्नेहा नलवडे आदी उपस्थित होते.