मलकापूर : येथील लोटस फर्निचर शोरूमला अचानक भीषण आग लागली. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. या अचानक लागलेल्या आगीत शेडसह फर्निचर जळून खाक झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत फर्निचर व कच्च्या मालासह शेडचे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे.
पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत मलकापूर येथे मुकेश माने, अनिरुद्ध तवटे व तानाजी जाधव यांच्या मालकीचे लोटस फर्निचरचे दीड एकरात फर्निचरचे शोरूम आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे हे शोरूम अनेक दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शोरूमच्या पाठीमागील बाजूने अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे शोरूमला आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. आगीचे आकाशात लांबपर्यंत धुराचे लोट पसरलेले होते. अर्ध्या तासातच आगीने शोरूमचा निम्मा भाग व्यापला होता. भर दुपारी उन्हाची तीव्रता असतानाच आगीचे लोळ बाहेर पडत होते. चार अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे लोटस फर्निचरचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग कशामुळे लागली हे प्रथम दर्शनी समजू शकले नाही. तरीही शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
(चौकट)
गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज..
आगीने राैद्ररूप धारण केल्याने धुराचे लाेट माेठ्या प्रमाणात पसरल्यामुळे महामार्गासह परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. आग पाहण्यासाठी झालेल्या गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
चौकट
बंबांना जवळच २४ तास योजनेचे पाणी उपलब्ध
आगीची माहिती मिळताच मलकापूरचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पालिकेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात यांच्यासह युवक व पंधरा ते वीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रत्येक अग्निशामक बंबात एक कर्मचारी देऊन मलकापूर २४ तास पाणीपुरवठा योजनेचे पाणी जवळच उपलब्ध करून दिले.
फोटो..
२९मलकापूर०१/०२/०३
१) मलकापुरात गुरुवारी दुपारी फर्निचर शोरूमला भीषण आग लागली. त्यावेळी आगीचे लोळ व धुराचे लोट भाहेर पडत होते.
(छाया - माणिक डोगरे)