वाठार स्टेशन : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रांसमोर लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी आठपासून रांगेत उभे राहूनही डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे या लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
पिंपोडे बुद्रुकमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण सापडत असतानाच हे लसीकरण केंद्र कोरोना विस्फोटास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयातील या लसीकरण केंद्रात दररोजच लसीकरणासाठी तोबा गर्दी पहावयास मिळत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व मास्कबाबत गांभीर्य दिसून येत नाही. ४५ वयांपुढील नागरिकांसाठी सध्या लसीकरण सुरू असल्याने अनेक वृद्ध महिलाही रांगेत उभारलेल्या दिसून येत आहेत. या ठिकाणी उन्हात उभे रहावे लागत असल्यामुळे लोक जिथे सावली मिळेल, त्या ठिकाणी घोळका करून उभे राहत आहेत. या केंद्रावर मनुष्यबळाचा तुटवडा असून रांगेतील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळावयास सांगणारा एकही कर्मचारी दिसून येत नाही. या केंद्रावर एक अधिकारी, कोरोना रजिस्ट्रेशन करणारे कर्मचारी असून, त्यांनाही या गर्दीवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे जात आहे. या लसीकरण केंद्रावर मुबलक प्रमाणात मनुष्यबळ नसल्यामुळे असे गोंधळाचे प्रकार घडत आहेत. या केंद्रावर लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या लोकांना पाण्याची सोय तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडपाची सोय करणे गरजेचे आहे.
त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
फोटो..
१८संजय कदम
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रांसमोर लस टोचून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.