महावितरण कंपनीने थकीत वीजधारकांची वीजजोडणी तोडायला सुरुवात केली आहे. कोणतीही लेखी नोटीस न देता आणि कसलीही पूर्वकल्पना न देता वितरणचे कर्मचारी वीजजोडणी तोडत आहेत. काही रक्कम भरण्याचा तगादा लावत आहेत. मात्र इच्छा असूनही कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सामान्य ग्राहक हतबल झाले आहेत. ते विनवणी करीत आहेत. मात्र, वीज कर्मचारी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता आपले काम चोख बजावत आहेत. त्यामुळे ग्रामीण ग्रामीण जनता आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दहावी व बारावीची परीक्षा लवकरच होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीने अनेक दिवस शाळा बंद होत्या. खासगी शिकवणीही यंदा विद्यार्थ्यांना मिळाली नाही. ऑनलाईन शिकवणुकीतून जे काही ज्ञान पदरात पडले त्यावरच त्यांना तयारी करावी लागणार आहे. तसेच पाचवी ते आठवीचे वर्ग आता सुरू झाले आहेत. मात्र इतर वर्गांना अजूनही ऑनलाईन शिकवणी सुरू आहे. वीजच नसल्याने मोबाईल चार्ज करणे तसेच तासाला हजेरी लावणे विद्यार्थ्यांना अवघड बनले आहे. अंधारामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र ही परिस्थिती सरकार लक्षात घेत नाही आणि नियमांवर बोट ठेवून काम करीत आहे.
कोरोना महामारीमुळे सर्व जग संकटात आले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे; तर अनेकजण रावाचे रंक झाले आहेत. शेतकरीही या काळात आर्थिक समस्यांचा सामना करीत होता. ग्रामीण जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला दर नसल्याने त्याची परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे वीज बिल भरणे अशक्य बनले आहे. उसाला तोड लागली तरी त्याच्या बिलातून मागील कर्ज वसूल होऊन उरलेले पैसे त्याच्या हातात येणार आहेत. त्याला अजून वेळ लागणार आहे. मात्र आताच वीजतोडणी केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार आहे.
- चौकट
मोहीम न थांबल्यास आंदोलन करणार
शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे. हाती पैसे नसल्याने वीज बिल भरणे त्याला शक्य होत नाही. या काळात त्याला आधार देण्याची गरज आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही वीजतोडणी मोहीम काहीकाळ पुढे ढकलावी. सुगी झाल्यावर सवलत देऊन काही करता येतेय का, हे पाहावे. मात्र मोहीम सुरू राहिल्यास याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन उभारले जाणार आहे.
- रामकृष्ण वेताळ, सदस्य
किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
- चौकट
काही दिवस सवलत मिळावी
सध्या उन्हाळा व परीक्षेचा काळ सुरू होत आहे. मनात असूनही हाती पैसा नसल्याने थकीत वीज बिल भरणे सध्या शक्य नाही. म्हणून ही मोहीम पुढे ढकलावी. सुगी झाल्यावर चार पैसे हाती येतील तेव्हा संधी देऊन पुन्हा मोहीम सुरू करण्याचा विचार सुरू करावा. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करू नये.
- शंकरराव पाटील
पालक, सुर्ली