सातारा : ‘गव्हासोबत किडे रगडले जातात,’ ही म्हण आपण नेहमी ऐकतो; पण याच म्हणीला उलट्या पद्धतीने म्हणण्याची वेळ सातारा तालुक्यातील वर्णे परिसरावर आलेली आहे. वीजबिल थकविणारे अन् आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करायची सोडून वीजवितरण कंपनीने येथील वीस गावांमध्ये सात तासांचे अघोषित भारनियमन सुरू केलेले आहे.‘गुन्हा एकाने करायचा अन् शिक्षा मात्र समूहाला’ देण्याचाच हा प्रकार असल्याचे मत वर्णे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत. वीज वितरण तर्फे देगाव, निगडी, तासगाव, राजेवाडी व इतर गावांमध्ये सात तास सक्तीचे भारनियमन सुरू केले आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरुवारी रात्री अडीच वाजता वीज गुल होते, ती सकाळी साडेआठ वाजता येते. तर शुक्रवार, शनिवार, रविवारी सकाळी ८.३० वाजता वीज जाते, ती दुपारी २.३० वाजता येते. भारनियमनामुळे या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. या परिसरामध्ये पोल्ट्रींची संख्या आहे. तसेच शेतीक्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. बहुतांश शेतकऱ्यांची शेतामध्येच वस्ती आहे. तुरळक वस्ती असल्याने चोरट्यांची भीती आणखी वाढली आहे. रात्रीच्या वेळी भारनियमन होत असल्याने दरोड्यासारखे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वीजवितरण कंपनी येथील भारनियमन बंद करणार का?, असा सवाल शेतकरी व्यक्त करत आहेत.दरम्यान, जे शेतकरी अथवा ग्राहक वीज चोरी करत आहेत, त्यांचा शोध वीजवितरणने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. किंवा जे ग्राहक वीजबिले थकवत आहेत. त्यांचे वीजकनेक्शन तोडावेत. वीज बिले प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर कारवाई का केली जात आहे?, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. भारनियमनाच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून, शेतीला पाणी देता येत नसल्याने पिकेही करपू लागली आहेत. वीज वितरण कंपनीने गुन्हेगारांवर कारवाई करावी; परंतु प्रामाणिक ग्राहकांना त्यात रगडू नये, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)काय आहे ‘झेड’ ग्रुप?वीज वितरणतर्फे ज्या भागातील ग्राहक वीजबिले मोठ्या प्रमाणावर थकवितात तसेच ज्या ठिकाणी वीज गळती व वीज चोरी केली जाते, त्या भागाला ‘झेड’ दर्जा दिला जातो. या दर्जात वीज विभागाचा जो फिडर समाविष्ट केला जातो, त्या ठिकाणी अतिरिक्त भारनियमन सुरू केले जाते.वर्णे परिसरात शेतीपंपाची वीस लाख रुपये व घरगुती ग्राहकांची २९ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. एकूण १५ हजार ग्राहकांपैकी ५ हजार ग्राहकांनी वीजबिले वेळेत भरली नसल्याने या संपूर्ण परिसरात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. ही थकबाकी लवकर भरली जाणे आवश्यक आहे.- एस. एस. सय्यद, शाखा अभियंतावीजवितरण, वर्णे, ता. सातारा
इथं किड्यांसोबत गहूसुद्धा रगडतायत!
By admin | Published: February 22, 2015 10:25 PM