पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील वाठार, तळिये, बिचुकले, अरबवाडी आदी गावांमध्ये झालेल्या घडफोडीप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.यामध्ये प्रदीप प्रकाश माने (वय २६) अक्षय बाजीराव दोरके (२०) इर्शाद हारून मुल्ला (३६ तिघे, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) विजय बाळू जाधव (१९, रा. भाडळे, ता. कोरेगाव)व एक अल्पवयीन आरोपीस अटक केली आहेत.याबाबत माहिती अशी की, वाठार स्टेशन परिसरात मागील काही दिवासंपासून चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. वाठार, तळिये, बिचुकले, अरबवाडी आदी गावांमध्ये घरफोडी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून टोळीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, वजन काटा, दीड तोळे सोने लगड, दुचाकी आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, हवालदार नितीन भोसले, तानाजी चव्हाण, सचिन जगताप, नितीन पवार, खरात, तुषार आडके, तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा अधिक तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.