सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील अंतिम टप्प्यात सातारा जिल्ह्यातील पाच गावे असून, जिल्हावासीयांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरवर्षी राज्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो. या गावांना दुष्काळातून सोडविण्याचे व जलसंधारणाच्या मार्गाने पाणीदार करण्याचे काम पाणी फाउंडेशन मागील दोन वर्षांपासून करत आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते. या विचारातून २०१६ मध्ये अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे.
या फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकविण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रामची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकºयांनी करावा, यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.
स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाºया तीन गावांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस ५० लाख रुपये आहे. दुसरे बक्षीस ३० लाख आणि तिसरे बक्षीस २० लाख रुपये आहे. तसेच याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाºया गावाला रोख बक्षीस दिले जाणार आहे.वॉटर कपच्या निमित्ताने विजेत्या गावांना देण्यात येणाºया बक्षिसांची एकूण रक्कम ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे.
पुण्यातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमीर खान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ होणार आहे.
स्पर्धेतील अंतिम १२ गावे...
सातारा जिल्हा : बिदाल, अनभुलेवाडी, भोसरे, यलमरवाडी, पवारवाडी
सांगली जिल्हा : शेरेवाडी, कानकात्रेवाडी
बीड जिल्हा : पळसखेडा, जायभाईवाडी
औरंगाबाद जिल्हा : गोळेगाव
वर्धा जिल्हा : काकडदरा
अकोला जिल्हा : जितापूर