लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: कुडाळ, ता. जावळी येथे गुरांच्या गोठ्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोटरसायकली, जुगाराचे साहित्य असा सुमारे ३ लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्रमोद दत्तात्रय खटावकर (वय ५४), सचिन विजयराव शिंदे (वय ४५), संदीप अशोक शिंगटे (वय ४०, रा. कुडाळ, ता. जावळी), राहुल सदाशिव गावडे (वय ३९, रा. खर्शी, बारामुरे ता. जावळी), दत्तात्रय सदाशिव नवले (वय ४५, रा. सातारा, ता.जावळी), गजानन सदाशिव तांबोळी (वय ४२, रा. मेढा, ता. जावळी),सुनील अरुण तावरे (वय ५१, रा. आरडे, ता. जावळी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.
हे सर्वजण कुडाळ, ता. जावळी येथील नागोबाचा माळ नावाच्या शिवारात लक्ष्मण पवार यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जुगार खेळत होते. याचवेळी मेढा पोलिसांनी बुधवारी दुपारी तेथे अचानक छापा टाकला. यावेळी हे सर्वजण जुगार खेळण्यात व्यस्त होते. पोलिसांनी त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी हा जुगार अड्डा सुरू असल्याचे पोलिसांना समजले होते.