कऱ्हाड : पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कऱ्हाड शहर पोलिसांच्या मदतीने साताऱ्याच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाने मलकापूर-कऱ्हाड येथील नवरंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. क्लबचालक प्रदीप शंकर सुर्वे (रा. मलकापूर-कऱ्हाड), शंकर दादासाहेब काळे (रा. आगाशिवनगर-मलकापूर, कऱ्हाड), इसाक मुश्ताक नायकवडी (रा. कासेगाव, ता. वाळवा), अशोक महादेव पाटील (रा. कोयना वसाहत, कऱ्हाड), अशोक शामराव थोरात (रा. सवादे, ता. कऱ्हाड), प्रा. अशोक बाबूराव काळे (रा. मलकापूर), दशरथ खाशाबा शिंदे (रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), संजय परशुराम पवार (रा. पाटण), अधिक जगन्नाथ शेवाळे (रा. कोळे), पोपट भरत यादव (रा. साईकडे, ता. पाटण), संजय मारुती माळके (रा. आगाशिवनगर, कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील हॉटेल नवरंगच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्याबाबत त्यांनी पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले यांना सूचना केल्या. उपअधीक्षक भोसले रविवारी दुपारी कऱ्हाडमध्ये दाखल झाले. त्यांनी छापा कारवाईबाबत शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला माहिती दिली. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिस पथक हॉटेल नवरंगमध्ये पोहोचले. त्यावेळी त्याठिकाणी पत्त्यांचा डाव सुरू होता. पोलिस पथकाने अचानक छापा टाकून पत्ते खेळणाऱ्या अकराजणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये क्लबचालकांसह इतरांचा समावेश आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा क्लबमधील सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आला. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक शशिकांत भोसले यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, कॉन्स्टेबल राजेंद्र कदम, ऋतुराज शिंदे, रोहित यादव, प्रफुल्ल गाडे आदींनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी) प्राध्यापक, शिपायाचा समावेश जुगारप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी अशोक काळे हे (खोपी, ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे प्राध्यापक आहेत. तर इसाक नायकवडी हा (बहे, ता. वाळवा) येथील विद्यालयात शिपाई आहे. प्राध्यापक, महाविद्यालयाचा शिपाई यांच्यासह अन्य काही प्रतिष्ठितांचाही समावेश आहे. रात्री संबंधित अकरा जणांना पोलिसांनी अटक केली.
जुगार अड्ड्यावर छापा; अकरा अटकेत
By admin | Published: September 25, 2016 11:43 PM