कऱ्हाड : सध्या कोरोनाचे थैमान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दररोज सापडणारे बाधित बघितले की उरात धडकी भरत आहे. मला कोरोना तर झाला नसेल ना? अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत आहे. रुग्णालयात गर्दी वाढली आहे. रुग्ण व नातेवाईकांना तिथला खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत गांधी फाैंडेशनने खास कोविड रुग्णालय सुरू करून मदतीचा हात दिला आहे. हे रुग्णालय अनेकांसाठी वरदान ठरत आहे.
येथील गांधी फाैंडेशन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. गतवर्षीही कोरोनाची लाट आली, त्यावेळी फाैंडेशनने रुग्णांना मदत करण्याचे चांगले काम केले. आता दुसरी लाट आली आहे, तिचे थैमान सुरू आहे. सामान्य माणसाचे अगोदरच कंबरडे मोडले असताना, त्याला हे संकट परवडणारे नाही. त्या कुटुंबात जर कोणी बाधित सापडले, तर संपूर्ण कुटुंब तणावाखाली जात आहे.
आज रुग्णालये फुल्ल आहेत. तपासणीचा खर्च रुग्णांना परवडत नाही, ही परिस्थिती आहे. पण ‘सर सलामत तो पगडी पचास’ याप्रमाणे माणूस जिवाची काळजी करतोय. पैसे उसनेपासने करतोय.
हे सगळे चित्र समोर आल्यानंतर कऱ्हाडच्या गांधी फाैंडेशनने बाधित व पोस्ट रुग्णांसाठी रुग्णालय सुरू केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून केवळ पन्नास रुपयांमध्ये रुग्णाची तपासणी व त्याला मार्गदर्शन केले जात आहे. इतर तपासण्या कराव्या लागल्या, तर त्याही सवलतीच्या दरात करून दिल्या जात आहेत. त्यामुळे हे रुग्णालय गरजूंना वरदान ठरत आहे.
भेदा चौक कऱ्हाड येथे सुरू केलेल्या या रुग्णालयात डॉ. अभिषेक रेणुसे, डॉ. संजय भागवत हे रुग्णांची तपासणी करीत आहेत, तर सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्यातून इतर तपासण्या माफक दरात करून दिल्या जात आहेत. यामध्ये रुग्णांना अचूक मार्गदर्शन मिळण्याबरोबरच त्यांच्या पैशाची बचत होत आहे. नुकतेच या रुग्णालयाचे उद्घाटन प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्याहस्ते करण्यात आले.
कोट
कोरोनाचे संकट हे देशावरील मोठे संकट आहे. अशावेळी हे संकट परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने मदत केली पाहिजे. आम्ही आमची जबाबदारी ओळखून फाैंडेशनच्यावतीने हे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. याचा गरजूंना नक्कीच फायदा होत आहे. त्यांचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप काही आहेत.
- धीरज गांधी
संचालक, गांधी फाैंडेशन, कऱ्हाड
फोटो :