सातारा : मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो माझ्यावर होईल; परंतु मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच होईल, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.|शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी पालिकेत बैठकीचे आयोजन केले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास रजेशिर्के यांच्यासह शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील गणेशमूर्ती विसर्जनावर तोडगा काढण्यात आला. मात्र, दहा फुटांपेक्षा उंच असलेल्या मूर्तींचे कण्हेर धरणाजवळील खाणीत विसर्जन करण्यात यावे, असे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले. आम्ही स्वमालकीच्या असलेल्या मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, असे आदेश दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०१५ ला शहरातील तीन तळ्यांबाबत जो निर्णय देण्यात आला होता, तो कायम ठेवल्याने मंगळवार तळ्यातील विसर्जनाचा मार्गच बंद झाला असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक ते तळे आमच्या मालकीचे आहे. त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास आमची कोणतीच हरकत नाही, तळ्याचा निर्णय हा आमचा असताना प्रशासन कसा काय याबाबत निर्णय घेऊ शकते? तेरा किलोमीटर लांब मूर्ती विसर्जन करणे मुळीच शक्य नाही. पोलिसांनी लोकांच्या भावनांशी खेळू नये.
उद्या जर मूर्तीची विटंबना झाली तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. प्रदूषणाबाबत जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर उद्योगधंदे, कारखान्यांवर करा. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो माझ्यावर होईल; परंतु मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे मंगळवार तळ्यातच होईल, असेही ते म्हणाले. या तळ्याबाबत खा. उदयनराजे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली.