सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात सोमवारी गणेश जयंती सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने भाविकांनी यंदा सोशल डिस्टन्सचे पालन करत गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे शहरात गणेश जयंती सोहळा शांततेत व धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील पंचमुखी, खिंडीतील गणपती, ढोल्या गणपती, अजिंक्य गणेश, गारेचा गणपती, कृष्णानगरचा सुविधा गणेश, कड्याचा गणपती अशी विविध गणपती मंदिरे ्रआकर्षक विद्युत रोषणाईत धार्मिक कार्यक्रमांसाठी सज्ज करण्यात आली होती. दुपारी विविध गणेश मंदिरांत विधिवत पद्धतीने गणेश जन्म साजरा करण्यात आला. तसेच गणेश याग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असे धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.
शहरातील फुटका तलाव गणेश मंदिर गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले होते. जयंतीदिनी या मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांची सकाळपासूनच मंदिरात रेलचेल सुरू होती. जन्मकाळ साजरा झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. खिंडीतील गणपती व खण आळीतील पंचमुखी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर कर असे साकडे भाविकांनी गणेशाला घातले.
फोटो : १५ जावेद ०१/०२
साताऱ्यतील कुबेर गणेश मंदिरात सोमवारी गणेश जयंतीनिमित्त गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (छाया : जावेद खान)