पाटण शहरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेशभक्तांंचे श्रद्धास्थान असलेल्या येथील लायब्ररी चौकातील हनुमान सेवा मंडळाने शहरात गणेश जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी श्रींंची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र, यावर्षी मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करून मंडळाच्यावतीने सामुदायिक जप, गंगाकलश, अभिषेक, होमहवन व जन्मकाळ असे धार्मिक विधी करून गणेश जयंती साजरी करण्यात आली.
शहरातील झेंडा चौकातील प्रताप सेवा मंडळ, लक्ष्मीदेवी मंदिरानजीक असलेले पुरातन मोरेश्वर मंदिर, महसूल कॉलनी येथील गणेश मंदिर, नवीन बसस्थानकाजवळील रिक्षा गेट, तसेच गगनगिरी मठ, आदी ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात येते. विविध अध्यात्मिक, तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील सार्वजनिक मंडळांनी, तसेच सामाजिक संस्थांनी मिरवणूक, महाप्रसाद तसेच मनोरंजनात्मक, आदी गर्दी होणारे कार्यक्रम रद्द केले. नियमांचे पालन करीत केवळ सामुदायिक जप, गंगाकलश, होमहवन आणि जन्मकाळ असे धार्मिक विधी करून गणेश जयंती उत्सव साजरा केला. यानिमित्ताने श्रींच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती. काही ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ नये. तसेच दर्शन सुलभ व्हावे, यासाठी दर्शनरांगा तयार केल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते.