सातारा : जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे अशी अफवा पसरली होती. सातारा पोलीस दलामार्फत त्याची शहानिशा करण्यात आली; मात्र ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याबाबत जर कोणी जाणीवपूर्वक याबाबत अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचे सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलामार्फत केले जात आहेत. नागरिकांनी अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या परिसरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती संशयित आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, नियंत्रण कक्ष किंवा ११२ येथे संपर्क साधावा. स्वतः कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात लहान मुले पळवणारी टोळी?, पोलीस अधीक्षकांनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 2:38 PM