कºहाड/उंब्रज : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी अडविले. मात्र, कार रस्त्यातच सोडून या टोळीने पोबारा केला. पोलिसांनी कारमधून एक पिस्तूल, जिवंत राऊंड भरलेले दोन लोड काडतुसे तसेच एक गावठी कट्टा आणि दरोड्यासाठीचे साहित्य हस्तगत केले. ही कारवाई कºहाड-मसूर मार्गावर शहापूर फाटा येथे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी उंब्रज पोलिसांत पाचजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.युवराज सर्जेराव साळवी (रा. कोपर्डे हवेली, ता. कºहाड), सूरज आनंदराव पाटील (रा. सुपने, ता. कºहाड) यांच्यासह तीन अनोळखींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड उपविभागात रविवारी पहाटे पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन आणि नाकाबंदी केली होती. शहापूर फाट्यावर सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहायक फौजदार संभाजी देशमुख, हवालदार सचिन देशमुख, संजय देवकुळे, पोलीस मित्र नागेश पाटील हे वाहने थांबवून तपासणी करीत होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक कार मसूरहून कºहाडकडे येताना दिसली. पोलिसांनी इशारा केल्यानंतर चालकाने कार थांबवली. त्यानंतर कारमधील पाचजण खाली उतरले. पोलीस त्यांच्याकडे चौकशी करीत असतानाच अचानक ते पाचही जण पळून गेले. पाठलाग करूनही ते पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी पंचांसमक्ष कारची झडती घेतली. त्यावेळी कारच्या डॅश बोर्डमध्ये एक पिस्तूल आणि जिवंत राऊंड भरलेले काडतुसे आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले.तसेच त्याठिकाणी युवराज साळवे याचे पाकीट आणि त्यामध्ये ओळखपत्रही पोलिसांना सापडले. मिरची पूड असलेली कॅरिबॅगही त्याठिकाणी होती. कारच्या पाठीमागील बाजूस एक सॅक आढळून आली. त्यामध्ये एक गावठी कट्टा आणि जिवंत राऊंड भरलेली मॅगझीन आढळली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले. ही टोळी दरोड्याच्या तयारीत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड युवराज साळवे, सूरज पाटील यांच्यासह अन्य तिघांवर उंब्रज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश अपसुंदे तपास करीत आहेत.सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील आरोपीगुंड युवराज साळवी हा कुख्यात गुंड सल्या चेप्या याच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वी मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, यापूर्वी त्याला काही काळाकरिता तडीपारही करण्यात आले होते. त्याची टोळी सध्याही सक्रिय असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांना पाहून पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:49 PM