सातारा : एका कुरिअर कंपनीच्या वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची लूट करून दरोडा टाकणाऱ्या सात सराईत संशयीतांच्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज,गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल असा सुमारे २४ लाख ७२ हजार ८२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.सरफराज सलीम नदाफ (वय ३४), मारुती लक्ष्मण मिसळ (वय २१), समीर धोंडिबा मुलाणी (वय २९) व रियाज दस्तगीर मुजावर (वय ३३, सर्व रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे (वय २४) व करन सयाजी कांबळे (वय ३४, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर), गौरव सुनील घाटगे (वय २३, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार हे शनिवार, दि.27 रोजी रात्री १० च्या सुमारास साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. रविवारी रात्री अडीच वाजता काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला चोरट्यांनी इनोव्हा गाडी आडवी मारली.त्यानंतर चोरट्यांनी वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून त्यांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरविले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स जबरदस्तीने हिसकावून दरोडा टाकून गाडीसह पसार झाले. याबाबत संतकुमार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, उनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती.तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयीत पुणे येथे असल्याची माहिती समोर आली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना संशयीतांबााबत माहिती दिली. त्यानुसार यवत पोलिस आणि सातारा पोलिसांनी कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी करून सर्व सात आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल दागिने असा सुमारे 24 लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, पुणे ग्रामीण एलसीबीचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, कोल्हापूर एलसीबीचे निरीक्षक महादेव वाघमोडे, स्वप्नील लोखंडे, संतोष पवार, रविंद्र भोरे,बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, हवालदार अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्निल माने, मयुर देशमुख, मोहसिन मोमिन, रोहित निकम, स्वप्निल दौंड, संकेत निकम, शिवाजी गरत आदींनी या कारवाईत भाग घेतला.
तिन्ही जिल्ह्याचे पोलीस एकवटले...साताऱ्याजवळील बोरगाव हद्दीत दरोडेखोरांनी कुरिअरच्या गाडीला लुटल्यानंतर कोल्हापूर, सातारा आणि पुणे पोलिसांनी समन्वय साधून आरोपींचा माग काढला.अवघ्या २४ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.